सातारा | कमी व्याज दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित महिलांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. कोमल सनी भिसे (वय- 26, रा. गणेश प्लाझा, देगाव रोड), अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे (वय- 42, रा. क्षितिजा अपार्टमेंट, शाहपुरी) अशी संशयित महिलांची नावे आहेत. याप्रकरणी स्वाती राजकुमार साळुंखे (रा. संभाजीनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिलेसह आणखी पाच जणांची फसवणूक झालेली आहे. संशयित महिलांनी 4 टक्के व्याजाने कर्ज देतो, असे सांगितले. त्यानुसार प्रोसेसिंग फीसह इतर विविध कारणे सांगून तक्रारदारांसह इतरांकडून गुगल पे, आरटीजीएस, चेकद्वारे सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपये घेतले. कर्ज मिळेल या आशेवर असताना तक्रारदार यांना कर्ज मिळाले नाही. त्यांनी दिलेले पैसे परत मागितल्यावर ते पैसेही मिळत नसल्याने अखेर तक्रारदारांनी शहर पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांनी तपासाला सुरुवात करत संशयित आरोपी महिलांना अटक करण्याची मोहीम राबवली. त्यानुसार संबंधित महिलांना अटक करण्यात आली. दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सातारा शहर, तालुका, फलटण, वडूज या परिसरातही कमी व्याजदरात कर्ज देतो, असे सांगून फसवणूक झाल्याची चर्चा आहे.
फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क साधा ः भगवान निंबाळकर
जिल्ह्यात संशयित महिलांकडून अशाप्रकारे कोणाचाही फसवणूक झाली असेल तर त्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा किंवा सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.