सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द गावाजवळ असलेल्या दोस्ती ढाब्याजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सायकलस्वार दोघे युवक जागीच ठार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) येथील स्वराज स्वरूपकुमार जानकर हा बुलेटवरून (MH 12TE 3006) पाडेगावकडे निघाला होता तर सुभाष अनिरुद्ध शिंदे (रा. बलवडी जि. सोलापूर) हा युनिकॉन मोटारसायकलवरून (MH 45 AS 3934) साताऱ्याकडे येत होता. दोस्ती ढाब्याजवळ आल्यानंतर या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की धडकेच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी नागरिकांनी तातडीने वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.