सांगली | भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजन शुन्य कारभारामुळे लसीकरण विभागाजवळ लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी केली होती. या केंद्रावर शिवीगाळ व धक्काबुक्कीचे प्रकार घडला. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिसून येत होते. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.
लसीच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लसीकरण बंद होते. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली होती. आज पुन्हा लसिकरणास सुरुवात झाली. परंतु पहिला डोस घेणाऱ्यांसाठी ७० व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी ९० डोस उपलब्ध झाल्याने, आपणास लस मिळेल की नाही ? अशी शंका उपस्थितांना येवू लागली.
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण कक्षाच्या दरवाजाजवळ प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांनी आत जाण्याच्या चढाओढीत एकमेकांना शिवीगाळ केली. यातून धक्काबुक्की व मारामारीचे प्रकारही घडले. गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून कोणीतरी नावांची यादी तयार करायला सुरुवात केली. ही वार्ता सर्वत्र पसरली. १६० डोस असून, नाव नोंद करणाऱ्या व्यक्तींनाच लस दिली जाणार असल्याची माहिती मिळाल्याने लसीकरण केंद्राला जत्रेचे स्वरूप आले.