परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील आणि 288 नेते आमदार होऊन विधानसभेमध्ये दाखलही होतील. आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्वाचा वाटा असणाऱ्या नेत्यांच्या पेहरावातही बदल झाल्याचं दिसून येत आहे. पूर्वी नेता म्हटलं की सामान्य माणसांना खादीचे, स्टार्च केलेले पांढरे शुभ्र कपडे घातलेले नेते अशी प्रतिमा दिसायची. त्यामध्ये धोती,कुर्ता, डोक्यावर कडक गांधी टोपी असा पेहराव असायचा. काळाबरोबर नेतेही बदलले आणि त्यांचा पेहरावही. आता क्वचितच अशा पेहरावातील नेतेमंडळी पाहायला मिळतात. कदाचित या निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्यांमध्ये त्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असेल.
आजही ग्रामीण भागातील अनेक लोक हाच पोशाख परिधान करतात काळानुसार ही कपडे बदलली आहेत. पूर्वी निवडणुकांचे पडघम वाजले की पांढऱ्या कपड्यातील नेतेमंडळींचे थवेच्या थवे ग्रामीण भागात प्रचार करत फिरताना दिसायचे. परंतु सध्याच्या राजकारण्याच्या पटलावरुन धोतरधारी पुढारी कालबाह्य झाले आहेत. काहींनी तर राजकारणापासुन स्व:ताला चार हात दूरच ठेवणं पसंत केलं आहे.
पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातही या पोशाखाचा विशेष प्रभाव होता. मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्याचाही त्याकाळी हाच पोशाख होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांचा पेहरावही असाच होता.
मराठी चित्रपटात राजकीय नेत्याच्या भुमिका गाजविणारे निळु फुले, डॉ. श्रीराम लागु, राजा गोसावी, अशोक सराफ, नाना पाटेकर, मंकरद अनासपुरे आदी कलावंतही मुरब्बी राजकारण्याची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारताना या पेहरावात राजकीय नेत्याच्या भुमिका चांगल्या पध्दतीने गाजवल्या आहेत.
परभणी जिल्हयातील राजकीय क्षेत्रातील दिवंगत शेषराव अप्पाराव देशमुख, माजी खासदार शेषराव धोंडीराम भरोसे, माजी मंत्री सखाराम गोपाळराव नखाते, माजी मंत्री लिंबाजीराव दुधगांवकर, दिवंगत रामचंद्र देविदास देशमुख, माजी मंत्री माणिकराव भांबळे, माजी आमदार दिगंबरराव वडीकर, आदी नेत्याचा हाच पोशाख होता. परंतु काळाच्या ओघात हा पोशाख आता कालबाह्य झाला आहे. राजकारणाच्या पटलावरुन धोतरधारी पुढारी कालबाहय झाले असून सध्याच्या आणि आताच्या राजकारण करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. आताच्या निवडणुकीच्या वातावरणावरुन जुनी विचारपद्धती कालबाह्य झाली असल्याचे दिसून येत आहे. बदल, परिवर्तन हा निसर्ग नियम असून त्याप्रमाणे हे चालू आहे. नवा पेहराव केलेले नेते जरी निवडून आले असले तरी त्यांनी विकासाची गंगा गावागावापर्यंत आणावी व नवा महाराष्ट्र घडवावा अशी नव्या पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांकडून लोकांना अपेक्षा आहे.