लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर खा. छ. उदयनराजेंची कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता. लालमहाल हि वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याच संबधितांनी भान ठेवायला हवं होत. मात्र या वास्तूत एका सिनेमाचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानी कोणी हे चित्रीकरण केले असेल, त्यांनी ते चित्रीकरण सिनेमात वापरू नये. त्यांनी ते तात्काळ थांबवावे. तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यानी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, खरं तर लालमहाल हि वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र या ठिकाणी कोणत्याही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसानी कडक कारवाई करावी. अशीही मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

मुळात ही वास्तू पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात असून या चित्रिकरणासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे? त्याचबरोबर जे चित्रीकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.