सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत भाजप खासदार च. उदयनराजे भोसले यांनी दोघांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला सरकारने पदावरून बाजूला केले पाहिजे. आपली लायकी काय? कोणाबद्दल बोलतोय याचे भान टीका करताना राखले पाहिले. त्यांना पदावरून हटवणे जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली.
खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय समाजकार्यासह राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. देशाला एकत्रित ठेवायचे असेल तर छत्रपतींचे विचार जपावे लागतील अन्यथा भविष्यात देशाचे तुकडे होतील. राज्यपाल जे काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला भाजपचा पाठिंबा नाही.
राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. त्यांना आपण काय बोलतोय हे कळायला पाहिजे. राज्यपालांचे आता वय झाले आहे. त्यांना कोणत्या तरी वृद्धाश्रमात पाठवले पाहिजे. आणि सुधांशू त्रिवेदी यांनी जे काही विधान केले आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, त्रिवेदींची लायकी आहे का त्याला चपलीने मारलं पाहिजे, त्याच्या राजीनाम्याबाबत आपण थेट पंतप्रधानांना विनंती करणार आहे.
सुधांसू त्रिवेदी काय म्हणाले?
भाजपचे प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज याची तुलना स्वातंत्रवीर सावरकर याच्याशी केली आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहिली होती, असे विधान त्रिवेदी यांनी केले.
कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले.