हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज रायगडावरील निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्यात उदयनराजे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला. महापुरुषांचा अपमान होत असताना त्यावर पांघरून घालताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच आता आपला पुढचा मोर्चा आझाद मैदानावर असेल असेही त्यांनी सांगितलं
शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार केला. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणून आज आपण आहोत. मात्र देशाला आदर्श विचार देणाऱ्या शिवरायांची आज विटंबना होतेय. सतत अवमान केला जात आहे. चित्रपट, लिखाण आणि वक्तव्याच्या माध्यमातून शिवरायांची विटंबना होतेय आणि सरकार वमानाचे समर्थन करण्याचे धाडस दाखवत आहे असं म्हणत उदयनराजेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झालाय. पुढार्यांनी जाती धर्मात तेढ निर्माण केली. राजकारणातील स्वार्थ बघू मला खेद वाटतोय. देशात जस राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे त्याचप्रमाणे राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. पण त्या पदावर असताना अनेकदा शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची खिल्ली उडवली गेली. तरीही या अपमानावर पांघरून घालताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत उदयनराजेंनी सरकारवर घणाघात केला.