सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यात दोन राजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. उदयनराजे यांच्या गटाकडे असणाऱ्या सातारा पालिकेतील कारभारावरून आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यान, या आरोपांना उदयनराजेंनी उत्तर दिले असून त्यांनी थेट शिवेंद्रराजेंना चॅलेंज दिले आहे. ‘तुम्ही दिवस, वार, वेळ ठरवून समोरासमोर या. आम्ही भ्रष्टाचार कुठे अन् काय केला तो सांगा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय, तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन,’ असे उदयनराजेंनी म्हंटले.
सातारा विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी विविध विकासकामांचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावरनिशाणा साधला. ते म्हणाले, “ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत.”
Satara News : …तर मी माझ्या मिश्या आणि भुवया काढून टाकेन; उदयनराजेंचे थेट शिवेंद्रराजेंना चॅलेंज pic.twitter.com/glTW3tPi0e
— santosh gurav (@santosh29590931) March 24, 2023
तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली.आम्हाला नावे ठेवा; पण तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही. लोकांची सेवा करण्याचा जो वसा आम्हाला मिळालाय तो आम्ही जपत आहे.
उलट तुमच्याकडून घराण्याला अशोभनीय कार्य घडत आहे.तुम्हाला जनमत अजमावयाचं आहे तर सातारा काय महाराष्ट्रात चला. यांना लोकांसाठी झिजनं काय असतं, हे माहीत आहे का? तुम्ही जर महान कार्य केलं तर निवडणुकीत सर्वसामान्य माणसापुढे का टिकू शकला नाही. लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे. दुसऱ्याला कमी लेखून माणूस कधी मोठा होत नसतो. तो स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा होतो. मला काय स्वत:चं पेटिंग काढण्याची हौस नाही. लोकं का पेटिंग काढतायत याचा कधी विचार केलाय का?” असा सवाल उदयनराजे यांनी केला.