दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारा; उदयनराजेंचं अमित शहांना पत्र

udayanraje amit shah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्याचे राज्यसभा खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत भव्य असे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी अमित शाह याना दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे अशी मागणी उदयनराजेंनी अमित शाह यांच्याकडे केली.

त्याचबरोबर राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे अशीही मागणी उदयनराजेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल. तसेच महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक आहे असं उदयनराजे यांनी आपल्या पत्रात म्हंटल आहे.

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभुमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशीही मागणी उदयनराजे यांनी केली. उदयनराजे यांच्या मागणीला अमित शाह यांनीही प्रतिसाद दिला. याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले.