कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
प्रस्थापित मंडळींना सत्तेसाठी व काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे असं म्हणत काँग्रेस नेते उदयसिंह उंडाळकर यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांना टोला लगावला आहे. उंडाळे (ता. कराड) येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या प्रचारार्थ विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उदयसिंह पाटील म्हणाले, सहकारातील संस्था काकांनी निस्पृहपणे उभा केल्या. त्यांनी तयार केलेली माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे इमान राखण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीला व्यापक स्वरूप आले आहे. लोकनेते विलासराव पाटील – उंडाळकर रयत पॅनेलने सर्वसामान्य लोकांना संधी दिली आहे. आमच्याकडे धनदांडगे व कोणी मोठ्याचा मुलगा उभा नाही.
विलासकाकांनी अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना सत्तेमध्ये स्थान दिले. हे करत असताना काही प्रस्थापित मंडळी घुसली. आणि तीच मंडळी आपल्या समोर लोकशाहीला बगल देवून मतदारांवर दबाव आणत आहेत. प्रस्थापित मंडळींना सत्तेसाठी व काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे. प्रस्थापित आणि सरंजामदार हे सूत्र बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आले आहे. सर्वसामान्य लोकांना गुलाम बनवण्याच्या विचारातून ही मंडळी कार्यरत आहेत. त्यातून समाजाला वाचवण्यासाठी लढा उभा केला पाहिजे. या भूमिकेतून वाटचाल सुरू आहे. विलासकाकांनी संघर्ष केला. तो संघर्ष घेवून मी पुढे चाललो आहे. तुम्ही या संघर्षात या. बाजार समितीचा गुलाल हा तुमचाच आहे असं यावेळी उदयसिंह उंडाळकर यांनी म्हंटल.