बाळासाहेबांचे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल – उद्धव ठाकरे

0
165
Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत माहिती दिली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम 58 टक्के पूर्ण झाले असून हे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले.

मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, दादरमधील मुंबई महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांच्या आठवणी. फोटो असतील. या स्मारकाचे बांधकाम ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता करण्यात आलेले आहे.

बाळासाहेबांची भाषणं जनतेला जागृत करणारी आहेत. बाळासाहेबांची भाषणं जुनी भाषण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्मारक कधी होणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. आम्ही स्मारकासाठी एकही झाड तोडलं नाही. स्मारकासाठी अनेक बैठका घेतल्या. स्मारकाबाबत सर्व परवानग्या घेतल्या आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे ठाकरे यांनी म्हंटले.

स्मारकात शिवसेनेचे तोतयागिरी करुन झालेले मुख्यमंत्री नसतील

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात असतील, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

फडणवीसांना टोला

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते म्हणाले की, आधी मी बोलतो नंतर सुभाष देसाईंना माईक देईन. नंतर त्यांच्या हातून माइक परत घेणं बरोबर नाही, असे म्हणत ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.