शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का? ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगने एकनाथ शिंदे याना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला विधानसभेतील व्हिप वरून इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन करावं अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देत शिंदे गटाचा व्हिप आम्हाला लागू होणारच नाही असं म्हंटल आहे.

आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना व्हिप बाबत विचारलं असताना आयोगाने दोन गट मान्य केले आहेत. त्यामुळे त्यांच्या गटाचा व्हिप आम्हाला लागू होणारच नाही, आम्ही आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता आमचा आणि त्यांचा संबंध नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल.

यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निकालावरून सुद्धा घणाघात केला. निवडणूक आयोगाचा कारभार हा मेरी मर्जी याप्रमाणे चालला आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही. निवडणूक आयोगाला घाई करण्याची गरज नव्हती, सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या केसचा गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला का ? अशी शंकाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे.