हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप महायुतीवर सडकून टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला होता, आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. जरांगेच्या आडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) – पवारांचे (Sharad Pawar) राजकारण सुरु आहे असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व महत्वाच्या विषयांवर थेट भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, माझा आरक्षणाला विरोध आहे अशा बातम्या पेरण्यात आल्या. मात्र माझ आजही हेच मत आहे कि महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. शिक्षणापासून ते नोकऱ्यापर्यंत इतकं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे, मात्र तरी आपल्याला कमी पडते कारण बाहेरच्या लोकांना या सर्व सोयी- सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आरक्षण द्यायचं तर ते आर्थिक निकषांवर द्या हीच मनसेची पहिल्यापासून भूमिका आहे. पण आज आपण बघतोय कि जातीच्या आधारवर आरक्षण देण्याची मागणी होतीये आणि यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा हात आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला.
शरद पवार म्हणतात कि महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे ते समजतंय. हे जे काही सुरु आहे ते सर्व विधानसभेसाठी सुरू आहे. जरांगेच्या मागून मते मिळवण्यासाठी या लोकांचे प्रयत्न आहेत. पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्लॅन आहे. पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी सुरू केली, तेव्हापासुन जाती- जातीमध्ये द्वेष निर्माण झाला. शरद पवारांनी आरक्षणासाठी मोदींकडे शब्द का टाकला नाही? जर मोदी आणि पवार बारामतीमध्ये एकत्र येत असतील तर मग आरक्षणाच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत असा सवालही राज ठाकरेंनी केला.