शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील दुसऱ्या भागात त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघात केला आहे. एकनाथ शिंदे आटा बाळासाहेबांशी स्वतःची तुलना करत आहेत. उद्या कदाचित ते स्वतःला मोदी समजतील आणि पंतप्रधान पदावर दावा सांगतील असा टोला त्यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मुख्यमंत्रिपद मिळवले. आता तर ते स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांबरोबर करायला लागले आणि ही आमचीच शिवसेना म्हणत आहेत हा अत्यंत घाणेरडाआणि दळभद्री प्रकार आहे. उद्या ते नरेंद्र भाईशी स्वताची तुलना करतील आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! मी पण अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही. तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? असा सवाल संजय राऊतांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.