हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज राज्यात फिरत आहेत. उद्या ते गल्लीतही फिरतील. त्यांनी गल्लीबोळात फिरावं, त्यांनी महाराष्ट्र बघावा. महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी देशभरातील विविध राजकीय विषयांवरून मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा धडाका लावतायत, गल्लीबोळांत फिरतायत. एक-दोन दिवसांत ते घाटकोपर भागातही रोड शो करणार आहेत. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायटय़ांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. हे तुम्ही किती गांभीर्याने घेताय? असा सवाल त्यांनी मोदींना केला. तसेच लोकांच्या मनात आग आहे. मोदींना महाराष्ट्रांनी निवडून दिलं. भरभरून खासदार दिले. तुम्ही फक्त शिवसेनेचा घात नाही केला. तर महाराष्ट्राचा घात केला. त्यामुळे महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिले. मराठी माणसं या पद्धतीने कधीही कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाहीत; पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडतंय? आणि त्यांना म्हणजेच मराठी द्वेष्टय़ांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केला.
महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे मोदींनी गुजरातला नेले. महाराष्ट्रात येऊ घालणारे उद्योगही गुजरातला नेले. मी मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांची उद्योग पळवण्याची बिशाद नव्हती. मात्र आमचं सरकार पाडल्यानंतर त्यांनी गद्दारांना सोबत घेऊन उद्योग फिरवले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. गुजरातबद्दलदेखील माझ्या मनात काही आकस नाहीये. गुजरातही आमचाच आहे. १९९२-९३ साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलं. मोदी त्यावेळी कुठे होते?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.