हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या २ महिन्यावर आली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सुद्धा पुनः एकदा कामाला लागली आहे. मुंबईत महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) भव्य असा मेळावा सुद्धा पार पडला. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकदिलाने प्रचार करत आहेत. मात्र सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल? यावरून महाविकास आघाडीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण तो चेहरा जाहीर करावा असं आवाहन दोन्ही मित्रपक्षांना केलं. मात्र आधी निवडणूक, मग मुख्यमंत्री असं म्हणत काँग्रेस (Congress) नेत्यांनी ठाकरेंच्या या आवाहनाला ठेंगा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यात.
16 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच जो कोणी चेहरा असेल त्याला आपला जाहीर पाठिंबा असेल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र त्यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यानंतर किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यानंतर मात्र काँग्रेस नेत्यांनी हा प्रस्तावही पूर्णपणे फेटाळल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून कोणतीही चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता त्यांची हि मागणी ठाकरे गट स्वीकारणार का ते पाहायला हवं.
दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र अतिशय सावध भूमिका घेतली आहे. आम्ही शरद पवारांच्या नावावरच आणि चेहऱ्यावरचं निवडणूक लढवणार आहोत. मात्र महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी जो कोणी चेहरा देईल त्याला आमचा पाठिंबा राहील असं म्हणत पवार गटाने ठाकरेंच्या भूमिकेला फार काही आडकाठी केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून खरी चुरस असेल ती म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातच…. येत्या काही दिवसात सांगलीतील कडेगाव येथे महाविकास आघाडीतील बडे नेते पुन्हा एकदा एकाच स्टेजवर दिसणार आहे तेव्हा मुख्यमंत्री पदाबाबत कोणती घोषणा करण्यात येते का? हे पाहायला हवं.