हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात विधानसभा निवडणुकीला ३ महिने बाकी असतानाच महाविकास आघाडीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून वादविवाद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं धोक्याचे आहे. लोकांनी उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे, लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाहून मतदान केलं आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं. त्यामुळे खरंच तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना विचारलं असता पवारांच्या उत्तराने सस्पेन्स आणखी वाढला आहे.
शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस संजय राऊतांनी केलेल्या विधानावरुन, “उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का?” असा थेट प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नावर शरद पवारांनी अगदी सावध आणि मोजक्या शब्दात उत्तर दिले. सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे, आमची आघाडी हाच आमचा समुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही असं म्हणत पवारांनी हा प्रश्न टोलवून दिला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असं पवार थेटपणे बोलले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आणखी वाढला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद महत्व्वाची आहेच मात्र बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं होते.