हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील खेड येथील सभेननंतर शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात धडाडणार आहे. मालेगाव शहरातील कॉलेज मैदान येथे आज 5:30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे मालेगाव शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असेल.
सध्याच्या महाराष्ट्राच्या एकूण राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. अनेक जुने नेते उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडून गेले असा अप्रत्यक्ष आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्यांच्या या टिकेला उद्धव ठाकरे आज उत्तर देणार का? कि पुन्हा एकदा त्यांच्या निशाण्यावर भाजप आणि शिंदे गटच असेल हे सुद्धा पाहावं लागेल.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच मालेगावात उर्दू भाषेतील फलक लावण्यात आल्याने चर्चाना उधाण आलं होत. मुस्लिमबहूल पूर्व भागात किदवाई रोड, नवीन बसस्थानक, कुसुंबा रोड अशा मुख्य रस्त्यांवर हे उर्दू फलक झळकले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवही उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे नाशिकमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.