मुंबई प्रतिनिधी । राज्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं भाजपाशी नातं तोडलं असताना महासेनाआघाडीच्या रूपात नवं समीकरण तयार होताना दिसत आहे. त्यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकत्रित सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांची राज्यातील काँग्रेस नेत्यांबरोबर मुंबईत महत्वाची बैठक सुरु आहे.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटमध्ये ही बैठक सुरु आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेची मुख्य मागणी मुख्यमंत्रीपद तसेच सत्तेत फिफ्टी-फिफ्टी वाटा असणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद वाटप, विधानपरिषद अध्यक्षपद हे काँग्रेसचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत. मुख्यमंत्रीपद ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बाब असल्याने या मोबदल्यात शिवसेनेकडून अधिक मंत्रिपद मिळवण्याचे प्रयन्त काँग्रेस-राष्ट्रवादी करणार आहेत. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेते यावरच आता महासेनाआघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
काल उद्धव यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून काँग्रेससोबत आमचे मुद्दे आणि अटीसमोर ठेऊन आम्ही सत्तास्थापना करू असे सांगितले होते. तर काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी काल शिवसेनेला पाठिंबा देत असताना चर्चेतून एका ‘कॉमन मिनिमम’ प्रोग्रॅम ठराव झाल्यावर सत्तास्थापनेचा निर्णय घेऊ असे सांगितले होते.