हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यां विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पुण्यातील माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केलेली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे गटात आणखी एका माजी आमदाराचा समावेश झाला.
विजय शिवतारे यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे आणि पक्षाची शिस्त मोडल्याचे कारण सांगत शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. श्री. शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते, तसेच ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेना- भाजपा सरकारच्या काळात काम पाहिले होते. बंडखोर आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.
दरम्यान, शिवतारे यांच्या हकालपट्टीमुळे आता पुरंदर तालुक्यातही शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. आपल्या हकालपट्टीनंतर विजय शिवतारेही आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या विचारांशी फारकत घेणाऱ्यांना व्हाॅटसअप ग्रुपमधूनही काढण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.