हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. आता जरी आपण शांततेत गुढीपाडवा साजरा करत असलो तरी ही शांतता काही दिवसांनी जल्लोषात बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला. हातावरचं पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करु नका असं कळकळीचं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उद्योगपतींना केलं.
शत्रू समोर नसतो त्यावेळी आव्हानं जास्त असतात. त्यामुळे कोरोनासारख्या न दिसणाऱ्या शत्रूचा सामना घरातच बसून करायला हवा. कोरोनामुळे कुटुंबातील लोकं एकत्र आली आहेत ही सकारात्मक बाब आहे. घरात एसी बंद करुन मोकळ्या हवेचा श्वास घेण्याचा प्रयत्न करा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मराठी वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री, होम मिनिस्टर आणि चला हवा येऊ द्या या मालिकांचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी घरात टीव्ही पाहूनही तुम्ही आनंद घेऊ शकता असं सांगितलं.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत हे सांगत असतानाच उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालूच राहील असं स्पष्टीकरण दिलं. कोरोनाविरुद्धचं युद्ध आपण शिवरायांच्या गनिमी काव्याने जिंकू असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.