सातारा प्रतिनिधी । मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून त्या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा क्रूरतेचा कळस जेंव्हा उघडकीस आला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तातडीने आरोपींना अटक केली होती. मात्र आता या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान बलात्कार प्रकरणातील आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचे समजताच तेलंगणा पोलिसांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा व्हायला हवी असंही सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही ट्विटरवरून तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी’ हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन !’ असे ट्विट केले आहे.
तत्पूर्वी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून हे आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे.