BIG BREAKING: UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची त्यांचे आरोग्य महत्त्वाचे म्हणून आतापर्यंत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक पाऊल पुढे ठेवत यावर्षीची UGC -NET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

शिक्षण मंत्र्यांनी माहिती देताना म्हटले आहे की,’ covid-19 दरम्यान उमेदवार आणि परीक्षेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण लक्षात घेऊन राष्ट्रीय चाचणी संस्था यूजीसी – नेट डिसेंबर 2020 -21 ही पुढे ढकलण्याचा सल्ला मी दिला आहे’. अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

ICSE बोर्डाकडूनही 10 वी परीक्षा रद्द

देशात करोनाचा कहर वाढत असल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने अनेक परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे. याआधी बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.

सीबीएसईकडून ४ मे ते ७ जून या कालावधीत दहावीची, ४ मे ते १४ जून या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष सीबीएसईकडून जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यातील राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येत होती.

You might also like