अखेर उजनीचा पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द : इंदापूरचे शेतकरी आक्रमक तर सोलापूरकरांकडून स्वागत

Ujjani Dam Solapur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिल्यानंतर आज तातडीने  इंदापूर तालुक्यातील गावांसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी उपसा सिंचन योजनेला स्थगिती दिली असून सर्वेक्षण करण्याचा आदेशही रद्द केला आहे. या संदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या या भूमिकेचे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. तर इंदापूरचे शेतकरी आक्रमक झालेले पहायला मिळाले, त्यांनी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापूर हायवेवर टायर जाळत रस्ता रोको केला.

उजनी धरणतून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. कामाचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. दरम्यान, या निर्णया विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेसह भाजप व राष्ट्रवादीच्या आमदारांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. याच निर्णया विरोधात विविध शेतकरी संघटनांनी सरकारच्या विरोधात उजनी धरणावर आंदोलन सुरू केले होते.

याच संदर्भात रविवारी (ता.17) सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करत उजनीतून एक थेंबही पाणी नेण्याचा प्रयत्न केला तर रक्तरंजित आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा दिला होता. सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारानेच सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. यातूनच राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये ही सरकार बद्दल सुप्त नाराजी होती. यातच काल भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर हलगी आंदोलन केले होते. सरकारवरील वाढत्या दबावामुळे अखेर सरकारने उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूरला  देण्याचा निर्णय तुर्तास तरी मागे घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर विरूध्द इंदापूर असा सुरू असलेला संघर्ष थांबला आहे.

सोलापूर हायवेवर टायर जाळत रास्ता रोको

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील शेतकरी व संघटनांनी हिंगणगाव येथे पुणे सोलापूर हायवे वर टायर जाळत रस्ता रोको केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.