कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच डाटा आँपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण बंद करुन नागरिकांची गैरसोय केली.
याबाबत घटनास्थळावरील माहिती अशी, ओमिक्राँनच्या भीतीने सध्या सर्वत्र लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कराड तालुक्यातील उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी सुरू आहे. मात्र येथील कामकाजाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते. दुपारी 12. 30 पर्यत सुमारे 100 हुन अधिक जणांना लसीकरण करण्यात आले. सकाळी लसीकरणाला सुरुवात झाली मात्र लसीकरणा दरम्यान सिरीज व लसीकरणांसाठी आवश्यक सूई उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत शेकडो नागरिकांना सिरीज खाजगी मेडिकल मधून विकत आणण्यास सांगितले. त्यानुसार लसीकरणासाठी आलेल्या शेकडो नागरिकांनी मेडिकल मधून सिरीज विकत आणल्या त्यानंतर या नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी वस्तुस्थितीची पाहणी केली असता नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी डाटा आँपरेटर असणाऱ्या युवकांने व तेथील महिला कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे तेथील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले.
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या या सावळा गोंधळामुळे नागरिकांच्यात नाराजी आहे. याकडे आरोग्य विभागाचे वरिष्ठ गांभीर्याने लक्ष देणार का ?
चाैकशी करून कारवाई करण्याचे संकेत
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबु यांनी सर्व आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी आवश्यक सिरीज व साधने उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. उंब्रज आरोग्य केंद्रातील ही पहिलीच आलेली तक्रार आहे. याबाबत शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.