नवी दिल्ली । सध्याच्या काळात दिवसेंदिवस महाग होत चाललेला उपचारांचा खर्च टाळण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आवश्यक आहे. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुमच्या सर्व वैद्यकीय खर्चाच्या गरजा त्यामध्ये पूर्ण केल्या जातील. मात्र, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स समजणे अवघड आहे कारण याच्या अटी आणि नियम किचकट आहेत.
मात्र अशाही काही गोष्टी आहेत ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करत नाहीत. या गोष्टी लक्षात न ठेवल्याने तुम्हाला अशी मेडिकल बिले भरावी लागतील. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून वगळलेल्या रोगांच्या विशिष्ट लिस्ट साठी इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकते. आज आपण येथे अशा 5 वैद्यकीय सुविधांविषयी माहिती घेउयात ज्या नाकारल्या जाऊ शकतात.
कॉस्मेटिक सर्जरी
इन्शुरन्स कंपन्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचा अंतर्भाव केला जात नाही. उदाहरणार्थ, बोटॉक्स, तुमच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांखालील काळ्या रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी हा एक लोकप्रिय कॉस्मेटिक उपाय आहे, हे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध भागांतील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी लिपोसक्शन ही शस्त्रक्रिया देखील या लिस्टमध्ये समाविष्ट नाही. इम्प्लांट आणि तत्सम शस्त्रक्रियांसारख्या प्रक्रिया देखील क्लेमच्या कक्षेबाहेर ठेवल्या जातात.
वंध्यत्व किंवा गर्भधारणा
वंध्यत्व किंवा गर्भपात इत्यादीसारख्या इतर गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत झाल्यास हॉस्पिटलायझेशनचा खर्च हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरेजमधून वगळण्यात आला आहे. मात्र, काही मॅटर्निटी हेल्थ प्लॅन अशा खर्चाची पूर्तता करू शकतात, मात्र त्यांना वेटिंग पिरियड असू शकेल.
आधीच अस्तित्वात असलेले रोग
तुमचा क्लेम आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांमुळे नाकारला जाऊ शकतो. विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी एखाद्या आजाराने ग्रासले होते त्यांना या आजाराचे संरक्षण मिळू शकत नाही. मात्र, ही अट आणि संबंधित वेटिंग पिरियड प्रत्येक इन्शुरन्स कंपनी नुसार बदलतो.
ऐकणे कमी होणे
ऐकणे आणि पाहणे या दोन प्रकारचे आजार असू शकतात. हे एकतर आधीपासून अस्तित्वात असू शकते किंवा एखाद्या अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची आवश्यकता असू शकते. पहिल्या प्रकरणात, ते कव्हर केलेले नाही. दुस-या प्रकरणात, जर उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसेल, तर कव्हरेज उपलब्ध नाही.
डेन्टल कव्हरेज
डेन्टल उपचारांना सहसा हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते, म्हणून ते कव्हर केले जात नाही. मात्र, अपघाती दुखापतीमुळे डेन्टल खर्च झाल्यास, इन्शुरन्स पॉलिसी त्या खर्चाचा समावेश करते.