हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या मुसळधार पावसाचे वातावरण असल्यामुळे पर्यटक अशा निसर्गरम्य वातावरणात गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात आहेत. मात्र हीच ट्रेकिंग पुण्याच्या सहा तरुणांच्या अंगावर बेतली आहे. हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील सहा तरुणांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. गडावर गेलेल्या या सहातरुणांचा रस्ता चुकल्यामुळे त्यांना मुसळधार पावसात डोंगराच्या कपारीवर बसून रात्र काढावी लागली. परंतु यात निर्माण झालेल्या दाट धुकं आणि थंडीमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अनिल आंबेकर, अनिल गीते, गोविंद आंबेकर, तुकाराम तिपाले, हरिओम बोरुडे आणि महादू भुतेकर हे सहा जण कंपनीला सुट्टी असल्यामुळे हरिश्चंद्रगडावर गेले होते. परंतु, पुण्यातून निघाल्यानंतर त्यांना प्रवास पूर्ण करण्यासाठी दुपारचे तीन वाजले. यानंतर सर्वांनी तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली. मात्र मध्येच मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे सर्वजण रस्ता भरकटले. दाट धुकं आणि मुसळधार पावसामुळे त्याच्यावर डोंगराच्या कपारीचा आसरा घेण्याची वेळ आली.
या सगळ्या परिस्थितीत थंडीने काकडल्यामुळे अनित गिते तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु हतबल झालेल्या इतर सर्वांनाच त्यावेळी काहीच करता आले नाही. त्यांनी ती रात्र तशीच मुसळधार पावसात काढली. यानंतर दुसऱ्या दिवशी बाकी ५ जणांनी मदत मिळवण्यासाठी संपर्क करण्यास सुरुवात केली. शेवटी संपर्क झाल्यानंतर स्थानिक नागरिक पोलीस, वनविभाग, अधिकारी सर्व घटनास्थळी पोहोचले. पुढे या पाच जणांना खाली आणण्यात आले. सध्या यातील काही जणांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये एक अकरा वर्षाचा लहान मुलगा देखील आहे.
या सर्व घटनेनंतर हरिश्चंद्रगडावर जाताना काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच सध्या मुसळधार पावसाचा जोर असल्यामुळे तरुणांनी ट्रेकिंग टाळावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे. हरिश्चंद्र गडावर गेलेली ही सहा मुले पूर्ण एक दिवशी उपाशी असल्यामुळे त्यांच्या अंगातील त्राण देखील निघून गेले होते. तसेच जवळ रेनकोट चादर अंग झाकण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना थंडीने असह्य केले. मुसळधार पावसात त्यांचा कोणाशी संपर्क देखील होऊ शकला नाही. यादरम्यान अनित गिते तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब अत्यंत गंभीर असून सध्या संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.