Sunday, May 28, 2023

Unintended Calls आणि ऑनलाईन फ्रॉडला आळा घालण्यासाठी सरकार डिजिटल इंटेलिजन्स युनिट स्थापन करणार

नवी दिल्ली । देशात ऑनलाईन फसवणूकीच्या वाढत्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी सरकार मोठी पावले उचलत आहे. सरकारने डिजिटल माध्यमांतून वाढणारे कामकाज आणि व्यवहारात होणारी फसवणूक तसेच येणारे अनपेक्षित कॉल टाळण्यासाठी डिजिटल इंटेलिजेंस युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लवकरच सरकार टेलिकॉम कंपन्या टेलीमार्केटर कंपन्यांसमवेत बैठक घेणार आहे.

पोर्टल बनवले जाईल
फ्रॉड मॅनेजमेंट आणि कंझ्युमर प्रोटेक्शनसाठीही पोर्टल बनवले जाईल. ज्याद्वारे ग्राहक दूरसंचार कंपन्यांकडे अनपेक्षित कॉल, एसएमएस आणि आर्थिक फसवणूकीबद्दल तक्रार करू शकतील. त्याअंतर्गत अनपेक्षित व्यावसायिक कॉल किंवा ग्राहकांना एसएमएस पाठविणार्‍या कंपन्यांना दंड करण्याची तरतूदही केली जात आहे.

प्रकरणे योग्य वेळी निकाली काढण्यात येतील
स्थापन केले जाणारे युनिट वेळेत आर्थिक फसवणूकीची प्रकरणे सोडविण्यासाठी काम करेल. या बैठकीत डिजिटल व्यवहार सुरळीत करण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला. या बैठकीस दूरसंचार सचिव, दूरसंचार सदस्य आणि डीडीजी एक्सेस सर्व्हिस उपस्थित होते.

कडक कारवाई केली जाईल
फसवणूक करणार्‍यांना कोणाचेही पैसे हिसकवायला देऊ नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की,”आर्थिक फसवणूकीसाठी दूरसंचार साधनांचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यांच्यामार्फत सामान्य माणसाच्या कष्टाने कमावलेला पैसा हडपला जात आहे. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.”

डु नॉट डिस्टर्ब नंतरही येत आहेत असे कॉल
ट्रायच्या प्रयत्नांनंतरही येणारे अनपेक्षित कॉल्स थांबलेले नाहीत. अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत व्यावसायिक कॉल्सची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राहकांनी ‘डो नॉट डिस्टर्ब’ (DND) मध्ये रजिस्ट्रेशन केले असूनही त्याच नंबरवरुन व्यावसायिक कॉल आणि एसएमएस येतच आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.