Union Budget 2024 । आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या १० वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी चांद्रयान ३ मोहीम आणि नुकतंच पार पडलेला राम मंदिर उदघाटन सोहळा यावर विशेष भाष्य केलं. जगभरातील गंभीर संकटांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून मागील वर्ष हे भारतासाठी ऐतिहासिक ठरले आहे असं द्रौपदी मुर्मू यांनी म्हंटल.
राष्ट्रपतींच्या भाषणातील ठळक मुद्दे – Union Budget 2024
मागील वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले आहे. भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली असून भारताचा विकास दर सलग दोन तिमाहीत ७.५% पेक्षा जास्त आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला.
केंद्र सरकारने वन रँक वन पेन्शनही लागू केली, ज्याची चार दशकांपासून सर्वजण वाट पाहत होते. ही पेन्शन लागू झाल्यानंतर माजी सैनिकांना अंदाजे 1 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.
गेल्या काही वर्षांत जगाने दोन मोठी युद्धे पाहिली आहेत आणि कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना सुद्धा केला. मात्र एवढ्या जागतिक संकटानंतरही केंद्र सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली आणि सर्वसामान्य भारतीयांचा बोजा वाढू दिला नाही.
‘गरीबी हटाओ’चा नारा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर गरिबी दूर होताना आपण पाहत आहोत. माझ्या सरकारच्या कार्यकाळात सुमारे 25 कोटी देशवासीय गरिबीतून (Union Budget 2024) बाहेर पडले आहेत. आज देशात 100 टक्के संस्थात्मक प्रसूती होत असून त्यामुळे मातामृत्यू दरात मोठी घट झाली आहे
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत अनेकांना शंका होत्या मात्र आमच्या सरकारने हे सुद्धा करून दाखवलं
आज जगातील एकूण रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात. गेल्या महिन्यात यूपीआयद्वारे विक्रमी 1200 कोटी व्यवहार झाले. भारताची निर्यात सुमारे $450 अब्ज वरून $775 बिलियन पेक्षा जास्त झाली आहे. जीएसटीच्या रूपाने देशाला एक देश एक कर कायदा मिळाला आहे.