नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबतच्या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाल्यांनतर देशात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं आठवले म्हणाले. याआधी रामदास आठवले यांनी चीनच्या सर्व प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत आठवले म्हणाले कि, “चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्यांनी लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सैन्यांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे तसंच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार, उद्योग जगातला माझे नम्र निवेदन आहे की चीनमधून कोणत्याही प्रकारच्या सामुग्रीची आयात करू नका. चीन मधून मालाच्या आयातीवर बंदी आणावी.”
चायना धोकेबाज देश है. चायना को सबक सिखाने के लिये एकदिन आरपार की लढाई चायना के साथ लढणी चाहीये! pic.twitter.com/zlsyF10Xfp
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 18, 2020
ते पुढे म्हणाले कि, “लडाखच्या गलवान भागात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने कपटबुद्धीने नियोजन करून धोका देत क्रूर हल्ला केला. हा हल्ला भ्याड हल्ला होता. चिनी हल्ला भारतीय सैनिकांनी परतवून लावत आपले शौर्य सिद्ध केले. या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीन धोका देत राहून युद्धाची खुमखुमी दाखवीत असेल तर एक दिवस आरपारचे युद्ध लढून चीनला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’‘