परभणी : हॅलो महाराष्ट्र – भाजप प्रणीत केंद्र सरकारने अच्छेदिन तर आणलेच नाही या उलट प्रचंड महागाई व गॅसची भरमसाठ वाढ केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिला जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात एक अनोखे आंदोलन केले असून यावेळी त्यांनी पोष्ट कार्यालयात जावून केंद्र सरकारला शेणाच्या गोवऱ्या पार्सल द्वारे पाठवल्या आहेत.
परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांचे नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे 4 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने केलेल्या महागाई व गॅस वाढीचा निषेध करण्यात आला.ग्रामीण भागात एकीकडे उज्वला गॅस मोफत द्यायचा आणि दुसरीकडे गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ करायची हा प्रकार सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे म्हणत या धोरणाने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ आली आहे. हे केंद्र शासनाच्या निर्दशनास आणून देण्यासाठी पाथरी शहरातील पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन केंद्र सरकारला शेणाच्या गोवऱ्या पार्सल ने पाठवून निषेध व्यक्त केला.
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाथरी विधानसभा अध्यक्षा मिराताई सरोदे,तालुकाध्यक्षा सुनंदाताई फलके,शहराध्यक्षा रेखाताई मनेरे,रेणुका सावळे,मंगलताई सुरवसे,लत्ताताई साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी राकाँ महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते यांनी केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टिका केली. त्या म्हणाल्या, “गेल्या दिड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले असतांना केंद्र शासन ची प्रचंड महागाई व गॅस दरवाढीचा आलेख उंचावत आहे.हा प्रकार सर्वसाधारण जनतेच्या जिव्हारी लागणारा आहे.”