सातारा | गेली 22 वर्षे 7 महिने भारतीय सैन्यदलात देशसेवा बजावलेले देशमुखनगर (जावळवाडी) येथील विनोद सयाजी जगताप यांचा सेवानिवृत्तीने उत्साहात स्वागत करण्यात आले. तरूणांनी मोटार सायकल रॅली काढून मायभूमीत उत्साहात अनोख्या पध्दतीने मिरवणूक काढून जवान विनोद जगताप यांचा सत्कार केला.
जावळवाडी येथील गिरणी कामगार सयाजी जगताप यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या एकुलत्या एका मुलाला शिकवले. आई आक्काताई यांनी विनोद यांच्या शिक्षणावर जास्त केंद्रित करून सैनिक बनविण्यासाठी जास्त भर दिला. विनोद हे बाविस वर्षापूर्वी इंदोर येथे सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी वेस्ट बंगाल, जम्मू, पंजाब अमृतसर, काश्मीर कुपवाडा, संयूक्त राष्ट्र शांतीसेना, बांग्लादेश, गुजरात कच्छ, त्रिपूरा, याठीकानी येथे देशसेवा केली.
सेवानिवृत्त जवान विनोद जगताप म्हणाले की, बावीस वर्षे सेवा बजावत असताना जम्मू येथे ड्युटीवर असताना रात्री आठच्या दरम्यान आमच्या कंपनीवरती अफगानी, पाकिस्तानी अतिरेक्यांनी आर्धा तास गोळीबार चालवला होता. यावेळी आमच्या 70 जवानांनी त्या अतिरेक्यावरती प्रतीहल्ला करून पळविले होते. देशसेवा करण्याची मला चांगली संधी मिळाली. आजच्या तरूणांनी देशसेवेसाठी प्रयत्न करावेत. आजचा माझा सन्मान हा भारत मातेचा सन्मान आहे.
विनोद यांचे जन्मभूमीत ठिकठीकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. पुणे- बंगलोर महामार्गावरील निसराळे फाटा येथून तरूणांनी व ग्रामस्थांनी मोटार सायकल रॅली काढून सेवानिवृत्त जवानाचा सन्मान केला. यावेळी आजी- माजी सैनिकांचा, पोलीस सेवानिवृत्त यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक सतिश जाधव यांनी केले. आभार सतिश काटकर यांनी मानले.