पुणे प्रतिनिधी । सध्या राज्यातील सरकार स्थापनेबद्दलचे चित्र अस्पष्ट असून आणखी किती दिवस राष्ट्रपती राजवट लागू राहणार याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. या सत्तेच्या नाट्यमय घडामोडीत विद्यार्थी निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आणि अवघ्या दोन महिन्यांत परीक्षांचा हंगाम सुरु होत असल्याने विद्यार्थी निवडणूक होणार का असा सवालही उपस्थित होतोय. राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यार्थी निवडणूका घेण्याचे ठरले होते. या निवडणूकांनंतर विद्यार्थी परीषद अस्तित्वात येणे आवश्यक होते. मात्र विधानसभा निवडणूकादेखील याच दरम्यान होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारने विद्यार्थी निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.
विधानसभा निवडणूका पार पडल्या. पण सराकरच स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी निवडणूका घेण्याबाबत अद्याप तरी कुठलाच निर्णय झालेला नाही. विद्यार्थी निवडणुकांबद्दल साशंकता असल्याने विद्यार्थ्यांबरोबर सिनेट सदस्यांनीही नाराजी व्यक्त केलीये. विधानसभा निवडणुकीपूर्वीच या निवडणुका होणे अपेक्षित होते कारण पुढील १५ दिवसात हिवाळी सत्र त्यानंतर मुख्य परीक्षा चालू होतील त्यामुळे यंदा निवडणूकांवर टांगती तलवार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात नवीन विद्यापीठ कायद्यात विद्यार्थी निवडणूकांची तरतूद आहे. त्यानुसार निवडणूकांची नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र यावर्षी तरी महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांचा गुलाल उधळेल असे आता विद्यार्थी संघटनांना वाटत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर निघताना पाहायला मिळत आहे.