विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील.

कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील पदवी-पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरू झाल्या. त्यापैकी पदवी अभ्यासक्रमाच्या काही विषयांचा निकाल 24 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान जाहीर झाला. त्यामध्ये बीबीएचा 1 ते 6 वे सत्र परीक्षा बीएससी (ॲनिमेशनचे 3 ते 6 वे सत्र), बीएसी (वर्कशॉप टेक्नॉलॉजीचे 1 ते 6 वे सत्र), बीएसी (हार्डवेअर ॲंड नेटवर्किंगचे 1 ते 6 वे सत्र) तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या फॉरेन लैंग्वेज आणि भूगोल या दोन विषयांचे निकाल जाहीर झालेला आहे. उर्वरित पदवी व पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक महाविद्यालय दुर्गम भागापर्यंत विखुरलेली असल्यामुळे परीक्षेचे साहित्य संकलित करण्यास अडचणी येतील. या कारणास्तव होम सेंटरचा विचार नाही असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे. दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रांवर जाऊन लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लिखाणाचा सराव कमी झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत एका तासा मागे 15 मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाणार आहे.

विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टपासून –
यंदा एक ऑगस्ट पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा जुलै अखेर पर्यंत चालणार असून निकाल कधी लागतील प्रवेश प्रक्रिया कधी राबवली जाईल असा पेच महाविद्यालयांना पुढे उभा राहिला आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंडळ यांनी सांगितले की, विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्र परीक्षा सुरू होतील. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा जुलैमध्ये होतील. लगेच निकालाची तयारी केली जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. दुसरीकडे या वेळी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत तर पेपर तपासणीला वेळ लागेल. त्यानंतर निकाल जाहीर होतील. मग पुढे प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

Leave a Comment