राज ठाकरे भाजपचा अजेंडा राबवत आहेत; संजय राऊतांचा निशाणा

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या नंतर राज्यभर वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे भाजपला हवा तोच अजेंडा राबवत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

देशभरात हिंदू-मुसलमानांत आग लावायची, दंगे भडकवायचे, त्याच आगीवर निवडणुकांच्या भाकऱ्या शेकवायच्या हा राजकीय खेळ देशाला जाळून टाकणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे सुरुवातीला ‘मराठी माणूस व अस्मितेचा प्रश्न’ घेऊन उभे राहिले. शिवसेनेसमोर हा विषय टिकला नाही तेव्हा आता ते हिंदुत्वाच्या दिशेने वळले व मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर मशिदीसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’ वाचू असा इशारा देऊन मोकळे झाले. भारतीय जनता पक्षाला हवा तोच अजेंडा श्री. राज ठाकरे राबवीत आहेत. मुंबई-ठाण्यात महापालिका निवडणुकांची ही तयारी व हनुमंताच्या नावावर दंगली घडल्या तर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रपती शासन, असा हा गुणरली’ खेळ सुरू आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.

हरिद्वारच्या एका हिंदू मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी येत्या पंधरा वर्षांत अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होईल असे सांगितले. हातात काठी घेऊन अहिंसेच्या मार्गाने अखंड हिंदू राष्ट्र तयार करू ही कल्पना चांगलीच आहे, पण रामाच्या नावाने अशा हिंसेचे तांडव करून देश अस्थिरता व तणावाच्या खाईत ढकलला जात आहे. त्यातून नव्या फाळणीची बिजे रोवली जातील व अखंड हिंदुस्थान करताना धार्मिक विद्वेषातून निर्माण झालेले आपल्याच देशाचे तुकडे तुकडे वेचावे लागतील असा इशारा राऊतांनी भाजपला दिला.

एका फाळणीसाठी माथेफिरू गोडसे निर्माण झाला. गांधींना त्याने मारले. मरताना गांधी ‘हे राम’ म्हणाले! आज तोच राम अहंकार, धर्मांधतेच्या अग्नीत देश जळताना पाहत आहे! रामाच्या नावाने तुकडे तुकडे गँग निर्माण होणार असेल तर अखंड हिंदू राष्ट्र कसे निर्माण होणार? रामाच्या नावाने निवडणूक जिंकाल, पण देश राहील काय?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.