औरंगाबाद – शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. या माहितीस विद्यापीठाचे उपकुलसचिव (आस्थापना) गणेश मंझा यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबित होण्याची नामुष्की ओढवली आहे.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे याने रात्रीच्यावेळी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याची तक्रार एका विद्यार्थिनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आठवडाभरापूर्वी दिली होती. त्यानंतर शिंदेंविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदेला बडतर्फ करा, निलंबित करा, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आदी संघटना आक्रमक झाल्या होत्या. तसेच मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी औरंगाबादेत आलेले असताना या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या एका विद्यार्थिनीने निवेदन देऊन संजय शिंदेवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
या नंतर काल शनिवारी सायंकाळी विद्यापीठाने संजय शिंदेला निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढले. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना यापूर्वी देखील तत्कालीन कुलगुरू प्रा. डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात निलंबित करून उस्मानाबाद उपकेंद्रात पाठवले होते.