विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी

Falthan City Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, राजू राम बोके (वय) ३४ रा. मंगळवार पेठ, फलटण) हा त्याच्या दोन साथीदारांसह फलटण येथे मित्राला भेटण्यास येणार आहे. त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूलही आहे. यावरून पोलिसांनी शहरातील स्वामी विवेकानंदनगर येथे आज मध्यरात्री सापळा लावला. तेव्हा मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास राजू राम बोके, दिलीप तुकाराम खुडे (वय ३२ रा. लक्ष्मीनगर, फलटण), मनोज राजेंद्र हिप्परकर (वय २७ रा. प्रेमलाताई हायस्कूल जवळ मलठण) हे एका दुचाकीवरून येताना दिसले.

पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची झडती घेतली असता राजू बोले याने त्याच्या कमरेला पिस्तूल खोचून ठेवलेले दिसले. पिस्तूल ताब्यात घेऊन त्यामधील मॅगझिन काढून पाहिले असता त्यात एक जिवंत काडतूस मिळून आले. पिस्तुलाबाबत बोके याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्या वेळी पोलिसांनी बोकेसह अन्य दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडे असलेली दुचाकी व तीन मोबाईल जप्त केले. त्यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तीनही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ मेपर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. गायकवाड तपास करीत आहेत.