मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे सावट; शेतकरी पुन्हा अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाडा, विदर्भात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी विभागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. उत्तर केरळपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी, राज्यासह मराठवाडा, विदर्भात कोरड्या वातावरणानंतर आता अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.

अवकाळी पावसामुळे यापूर्वीच शेतीचे नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा अवकाळीचे संकट घोंगावत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बदलते हवामान, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे आहे. मराठवाड्यातील पूर्वेकडील जिल्ह्यात व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता दिसत असल्याचे हवमान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

Leave a Comment