अरेच्च्या! पोलिसांनीचं झडतीच्या बहाण्याने सराफा व्यापाऱ्यांकडील लुटले दागिने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोरखपूर । उत्तरप्रदेशातील गोरखपूरमधील सराफा व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. सर्वात चकित करणारी बाब म्हणजे लुटमार करणारे हे पोलीसच निघाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पोलीस अधिकारीच या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले. या लुटारू पोलिसांच्या टोळीने व्यावसायिकांची झडती घेण्याच्या बहाण्याने अपहरण करून नौसढमध्ये १९ लाख रुपये आणि ११.२० लाख रुपयांचे दागिने लुटले होते. गोरखपूर पोलिसांनी गुरुवारी या लुटारू पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंजच्या निचलौल येथून लखनऊच्या दिशेने जात असताना, दोन सराफा व्यावसायिक दीपक वर्मा आणि रामू वर्मा यांना बुधवारी सकाळी खाकी वर्दीतील आरोपींनी झडतीच्या बहाण्याने बस थांब्यावर उतरवले. त्यांच्याकडील रोकड आणि सोन्या-चांदीचे लुटले. व्यापाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस खडबडून जागे झाले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता, एका वाहनाबाबत माहिती मिळाली. ती बस्ती येथील असल्याचे समजले. बस्ती जिल्ह्यातील जुन्या बस्ती पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस अधिकारी धर्मेंद्र यादव, शिपाई महेंद्र यादव आणि संतोष यादव हे ते वाहन घेऊन निघाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे एक पथक बस्ती येथे रवाना झाले. पोलिसांनी चालक देवेंद्र यादवला ताब्यात घेतले. त्यानंतर धर्मेंद्र यादव आणि दोन्ही शिपायांना अटक केली. कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी रोकड आणि लुटलेले दागिने हस्तगत केले. वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी पोलिसांना बडतर्फ करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment