शिवसेनेने केली चेतन चौहान यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । उत्तर प्रदेश शिवसेनेने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. चेतन चौहान यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “मंत्री चेतन चौहान यांना लखनऊमधील एसजीपीजीआय रुग्णालयातून गुरुग्रामच्या मेदांता या खाजगी रुग्णालयात का दाखल केले गेले, एसजीपीजीआय या प्रतिष्ठित संस्थेवर सरकारचा विश्वास नव्हता का? ” असा सवाल शिवसेनेने निवेदनाद्वारे केला आहे.

चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे चौहान यांना गुरुग्राममधील मेदांता या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.एसजीपीजीआय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीवर चौहान यांनी नाराजी दर्शवली होती.

अजूनही रुग्णालयाच्या दोषी डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोरोनामुळे राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही सरकार झोपा काढत आहे असेही या निवेदनात म्हटंले आहे. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी, उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचेही करोनाने निधन झाले आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सुनीलसिंह साजन यांनीही चौहान यांचा मृत्यू करोनामुळे नाही तर एसजीपीजीआय रुग्णालयात उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment