औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सह मराठवाडा आणि नगरची स्थान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने धरण आता 50 टक्क्यांपर्यंत भरत आले आहे. धरणात सध्या 16 हजार 345 क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली असून, आज सकाळपर्यंत धरण 48 टक्के भरले होते. तसेच गुरुवारी सायंकाळपर्यंत धरण 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरेल, अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी व्यक्त केली.
जायकवाडी धरणाची भिस्त नाशिक जिल्ह्यातील बंदिस्त पाणलोट क्षेत्रावर अवलंबून आहे. मराठवाड्यातील धरणे भरली असताना दुसरीकडे यंदा नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, तेथून आवक न झाल्याने जायकवाडी धरणात अद्याप 50 टक्के रिकामे आहे. गत वर्षी आजच्या तारखेला धरण 99 टक्के भरले होते. मागीलवर्षी 1 जून रोजी धरणात 35 टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचे मुख्य पाणलोट क्षेत्र असलेल्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून यांना पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. नाशिक जिल्ह्यातील धरणे सरासरी 70 टक्के भरले असून, तेथील धरले भरल्यानंतर नांदूर मधमेश्वर वेअर मधून जायकवाडी कडे पाणी सोडले जाते. सध्या या बंधाऱ्यातून फक्त 720 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील पाण्याची प्रतीक्षा जायकवाडी प्रशासनाला आहे.
मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी 1510.94 इतकी होती धरणात एकूण पाणीसाठा 1778.306 दलघमी तर उपयुक्त जलसाठा 1040.200 दलघमी इतका झाला होता. गतवर्षी आजच्या दिवशी चा उपयुक्त पाणीसाठा 2141.083 दलघमी म्हणजेच 99 टक्के एवढा होता. जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने, धरणात 16 हजार 345 एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू आहे. यामुळे येत्या 24 तासात धरणाचा जलसाठा 50 टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केली आहे.