सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मेढा येथे सर्व सोयींनीयुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारावे तसेच बामणोली येथे 10 बेडचे रुग्णालय उभारावे, असा आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिला आहे. कोविड रुग्णालयासाठी प्रस्ताव पाठवा तसेच या ठिकाणी सर्व त्या उपाययोजना कराव्यात. कोविड रुग्णालयासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे हैराण झालेल्या जावळीकरांची व्यथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, विजय सावले व उद्योजक के. के. शेलार यांनी मंत्री शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना ऐकवली. या वेळी एकनाथ ओंबळे म्हणाले, “जावळी तालुक्यात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत असून, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे बळी जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, म्हणून मेढा येथे कोविड रुग्णालय होणे गरजेचे आहे.”
यावर मंत्री शिंदे यांनी अधिकऱ्यांना दूरध्वनीवरून मेढा येथे ऑक्सिजनसह सर्व सोयींनीयुक्त 30 बेड व बामणोली येथे 10 बेडचे कोविड रुग्णालय उभारा, असा आदेश दिला. येत्या काही दिवसांतच ही सेवा सर्वसामान्य जावळीकरांसाठी नगरविकासमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल, असा विश्वास श्री. ओंबळे यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा