मुंबई । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मागच्या आठवडयाभरापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत असल्याचे त्यांनी स्वतःच पत्रकारांना सांगितले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियाचे औषध आहे. कोरोना व्हायरसविरोधात हे औषध गेमचेंजर आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे. कमालीची बाब म्हणजे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या COVID-19 च्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी असे ट्रम्प यांच्या स्वत:च्या सरकारचे निर्देश आहेत. पण ट्रम्प कोणालाही न जुमानता हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत आहेत. याच औषधाच्या पुरवठयावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला होता. भारताने या गोळयांची डिलिव्हरी केल्यानंतर त्यांनी आभारही मानले.
कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयाबाहेर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा उपयोग करु नका असा इशारा अमेरिकन एफडीएने दिला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळीचे साईडइफेक्टही आहेत तसेच कोरोना व्हायरसविरुद्ध ही गोळी तितकी परिणामकारक नाही असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. या औषधाचे साईड इफेक्टही असल्यामुळे त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही गोळी लुप्स, संधिवात या आजारांवरही वापरली जाते. या कारणांमुळे ट्रम्प यांना त्यांच्या डॉक्टरने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही गोळी न घेण्याचा सल्ला दिला आहे. “ही गोळी चांगली आहे. या औषधाबद्दल मी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे ही गोळी घ्यायला मी सुरुवात केली” असे ट्रम्प म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”