वृत्तसंस्था । अमेरिकेत करोनाचा संसर्ग थैमान घालत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील चर्चेत आहेत. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका आशियाई महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांना संताप अनावर झाला व “हा प्रश्न मला नाही, तर चीनला विचारा,” असं म्हणत पत्रकाराच्या प्रश्नावर भडकून ट्रम्प पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले.
अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजला आहे. अमेरिकेत करोनामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांची संख्या ८० हजारांहून अधिक झाली आहे. अशा वेळी अमेरिकेतील कोरोना परिस्थितीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी ‘कोरोना चाचण्या करण्यात जगात अमेरिका आघाडीवर’ अशा ओळी असलेलं एक बॅनर ट्रम्प यांच्या मागे लावण्यात आलं होतं. यावेळी सीबीएस न्यूजच्या आशियाई महिला पत्रकार वेईजिया जियांग यांनी ट्रम्प यांना या बॅनरवरील ओळीवरूनचं प्रश्न विचारला.
”अमेरिकेत ८० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाल्यानंतरही लस चाचणीला आपण जागतिक स्पर्धा म्हणून पाहत आहात का?,” असा थेट प्रश्न जियांग यांनी ट्रम्प यांना विचारला. त्याला ट्रम्प यांनी उत्तर देताना चीनलाच विचारा असे तिरकस उत्तर दिले. त्यानंतर ट्रम्प पुढील प्रश्नाकडे वळणार असताना जियांग यांनी मला तुम्ही विशेष उल्लेखून असं उत्तर देत आहात, का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर आपण सगळ्यांनाच उत्तर दिले असून जे मला वाईट प्रश्न विचारतात त्यांनाही माझे हेच उत्तर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदतेतून काढता पाय घेतला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारांमध्ये होणारे वाद नवीन नाहीत. याआधीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांसोबत वाद झाले आहेत. काही वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या वाद-प्रतिवादाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”