रेमडीसिवीरचा वापर मार्गदर्शक सूचनांसह खबरदारीपूर्वक करा

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या सुधारित वेळ मर्यादेचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या सुधारित वेळ मर्यादेच्या आदेशाच्या अंमलबजावणी बाबत नागरिकांना आवाहन करत असताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अंनत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर,  अन्न औषध प्रशासन सह आयुक्त संजय काळे,  मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.  नीता पाडळकर,  डीसीपी निकेश खाटमोडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, राज्य शासनाने 14 एप्रिल पासून ब्रेक द चेन चे आदेश जारी केले आहेत.  मात्र तरीही मोठया प्रमाणात कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले. कोरोनाच्या संर्सगाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालने करणे गरजेच असून वाढती गर्दी कमी होण्याच्या उदेशाने पोलिस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रित सुधारित कालमर्यादेचे आदेश 16 एप्रिलला जारी केले आहे. लोकप्रतिनिधी आणि व्यापारी वर्गानेही या सुधारित कालमर्यादेस सहकार्य करत पाठिंबा दर्शविला आहे. त्यानूसार सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीतच नागरिकांना किराणा सामान,  भाजीपाला,  पेट्रोल खरेदी इत्यादी साठी घराबाहेर पडता येईल. जीवितहानीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करुन सुधारित वेळ मर्यादा कटाक्षाने पाळावी. कामाशिवाय दुपारी 1 नंतर घराबाहेर पडू नये.  बाहेर पडताना कोविड नियमावली,  मास्कचा वापर आवर्जून करावा,  असे आवाहन करत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की,  विनाकारण घराबाहेर पडून नियमाचे उल्लंघन केल्यास दंडतमाक कारवाई केल्या जाईल.

संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत नियंत्रण अधिकारी, पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंपावर दुपारी 1 वाजेनंतर शासकीय वाहने, पोलीस,  आरोग्य,  इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाव्यतिरिक्त इतर कोणालाही पेट्रोल विक्री करता येणार नाही. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स,  रेस्टॉरन्ट संचारबंदी कालावधीत बंद राहणार असून फक्त घरपोच पाार्सल सेवा सुरू राहील. सर्व आठवडी बाजार 1 मे पर्यंत बंद राहतील. तसेच ज्या उद्योगांना परवानगी आहे केवळ तेच उद्योग नियमांच्या अधीन सुरू राहतील. संबंधित कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असून सर्व दुकानदार, आस्थापना व इतरांना आरटीपीसीआर, अँटीजन चाचण्या,  लसीकरण या बाबींची पूर्तता यापूर्वीच्या नियमांनूसार बंधनकारक राहील. या कालावधीत पूर्वीप्रमाणेच धार्मिक स्थळी केवळ नियमित पूजापाठ करता येईल. मात्र सामुहिक पूजा, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. त्याप्रमाणे सुधारित कालमर्यादेत सध्या रमजान सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 या सोबत सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत दुध, फळविक्री व्यवस्था सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचे पालन करुन रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडीसिवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. संबंधित प्राप्त अर्जांची अन्न औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करून त्यानंतर घाटीच्या औषध विभागात पात्र अर्ज संदर्भित केल्या जातील.  त्यातील रुग्णांच्या गरजेनुसार रूग्णालयास डॉ.  माधुरी कुलकर्णी यांच्यामार्फत रेमडीसिवीर उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत वैयक्तीकरित्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मदत कक्षात इंजेक्शनची मागणी करु नये.  खाजगी रुग्णालयामार्फतच इंजेक्शन मागणी केल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
सर्वांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वयंशिस्तीने प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करत स्व:तासह सर्वांच्या जीवीताचे संरक्षण करण्यास प्राधान्य द्यावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

You might also like