नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत की उत्तर प्रदेशमध्ये भाजप एखादा नवीन चेहरा देणार ? या संदर्भातील चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राजकारणामध्ये बदलाचं वारं वाहू लागले आहे. अशातच मुख्यमंत्री योगी यांच्या कट्टर समर्थकाने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे योगींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा प्रयत्न केल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा या समर्थकाने दिला आहे. विशेष म्हणजे हे पत्र त्याने रक्ताने लिहिले आहे. योगींच्या या फॅनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
योगी आदित्यनाथ यांना भाजपच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या अफवा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे योगींच्या समर्थकांमध्ये भाजपा विरोधात नाराजी दिसून येत आहे. योगींचा कट्टर समर्थक असलेल्या गोंडा जिल्ह्यातील सोनू ठाकूर याने भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना रक्ताने पत्र लिहिलेले पत्र पाठवलं आहे.
काही दिवसांपूर्वीच हे पत्र पाठवलं असलं तरी योगींच्या दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या पत्राची चर्चा सुरू आहे. ते पत्र एक जून रोजी लिहिलं गेलं होतं आणि त्यामध्ये योगी आदित्यनाथ त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवू नये अशी मागणी सोनूने केल्याचं एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. इतकच नाही तर सोनूने या पत्रामध्ये धमकीवजा इशारा देत योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले तर आपण लखनऊ मधील भाजपा कार्यालयासमोर स्वतःला पेटवून आत्मदहन करून घेईन असंही पत्रात म्हटलं आहे. मी आत्मदहन केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही उत्तर प्रदेश मधील भाजपच्या नेत्यांची असेल असेही या पत्रात म्हटले आहे.