सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 447 ठिकाणावरील लसीकरण मोहिम लस संपल्याने बंद ठेवण्यात आली आहे. लसीकरण बंद ठेवल्याने अनेक केंद्रावर आरोग्य कर्मचारी व नागरिकांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. सातारा जिल्हा रूग्णालयात (सिव्हील हाॅस्पीटल) कोव्हीडशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी संपलेल्या असून लस कधी येईल सांगू शकत नाही, असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणांसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करत लस न घेताच घरी जावे लागले.
सातारा जिल्ह्यात 11 तालुक्यातील आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र अशा 447 ठिकाणी लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतर अनेक शंका निर्माण केल्या जात होत्या. परंतु लस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम होत नसल्याची खात्री झाल्याने लोक लस घेवू लागले आहेत. सध्या 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोकाचाही लसीकरणाला उत्स्फुर्त सहभाग दिसून येवू लागला आहे. मात्र शुक्रवारी (दि.23) सायंकाळी जिल्ह्यातील संपूर्ण लस संपलेली असून शनिवारी (दि.24) सकाळी लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे फलक लावण्यात आले होते.
सर्वत्र कोरोना बांधितांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी बेड, आॅक्सिजन, व्हेटिंलेटर यांची कमतरता पडू लागली आहे. अशावेळी कोरोनाची लोकांच्यात भीती दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा लसीकरण करण्याकडे मोठा कल असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. लस उपलब्ध करण्याची मागणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. मात्र लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लसीकरण बंद ठेवण्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्यात वादावादी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावरती लस संपल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा