औरंगाबाद | कोरोनाला प्रतिबंध करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने लसीकरण केंद्रे वाढवण्यात येणार आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याला प्रतिबंध करण्याकरिता मनपा प्रशासनाच्या वतीने विविध पावले उचलण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री यांच्या सूचनेनंतर शहरातील लसीकरण केंद्रे वाढवली जाणार आहेत.
15 फेब्रुवारी पासून शहरातील कोरोना ग्रस्तांचा आलेख पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अख्खे कुटुंबच पॉझिटिव्ह निघत आहे. आजवर सुमारे पाचशे कुटुंब बाधित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासह दररोज एक हजार पेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवरच नुकतीच पालक मंत्री सुभाष देसाई यांनी स्थानिक प्रशासनाची आढावा बैठक घेतली होती. यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बेड्स वाढवणे, आरोग्य यंत्रणा आणखी व्यापक करणे यासह लसीकरण केंद्र वाढवण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या होत्या. यानुसार आता स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे.
मनपा हद्दीत सध्या 37 ठिकाणी लसीकरण केले जात आहे. आता ही संख्या वाढवून शंभर ठिकाणी लसीकरण केंद्र लवकरच सुरू केले जाणार असल्याचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.