सातारा जिल्ह्यात लसीचा साठा संपल्याने लसीकरण बंद ः शासनाकडे ५ लाख लसीची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहिम थांबवावी, लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.

1 एप्रिलपासून जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील सरसकट व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने प्रभावी नियोजन करुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केल्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कोरोनावरती नियंत्रण मिळविण्यासाठी लसीचे महत्व लोकांना पटले असून लोक मोठ्या प्रमाणावर लस घेवू लागले आहेत. जिल्ह्यासाठी लसीची मागणी शासनस्तरावर नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच लसीकरणाची मोहिमपुन्हा वेगाने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये पुन्हा सुरु येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी ३ लाख ९३ हजार लसीचे डोस मिळाले होते. अजून ५ लाख लसीची मागणी केली आहे. मात्र पुण्यात लसीचा साठा नाही. सध्या जिल्ह्यात १८० केंद्रावर लसीकरण चालू  आहे. शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर लसीचा पुरवठा करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूध्द आठले यांनी सांगितले आहे.

You might also like