तरूणांकडून मगरीच्या तावडीतून कालवडीची सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार

शिराळा तालुक्यातील मांगले व पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावच्या दरम्यान असलेल्या वारणा आणि कडवी नदीच्या संगमाजवळ मगरीने एक वर्षाच्या कालवडीवर बुधवारी सकाळी हल्ला केल्याची घटना घडली आहे. नदीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बाजीराव शेवडे या तरुणाने धाडसाने मगरीच्या तावडीतून कालवडीची सुटका केली.

मांगले येथील बाजीराव पांडुरंग शेवडे हे वारणा नदी काठावरील डाग शिवारातील वस्तीजवळील नदीच्या संगमाजवळ गाई आणि एक वर्षाच्या कालवडीला पाणी दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. गाई आणि कालवडीला एकच दोरी बांधली होती, गाई नदीतून पाणी पिऊन बाहेर आल्यानंतर कालवड पाणी पित होती. त्यावेळी बाजीराव नदीच्या काठावर उभे होता. अचानक मगरीने कालवडीवर हल्ला केला. बाजीराव यांच्या लक्षात आल्यानंतर बाजीराव यांनी धाडसाने मगरीच्या नाकावर ठोसा हाणला. त्यानंतरही मगरीने कालवडीला सोडली नाही, प्रसंगावधान ओळखून बाजीराव यांनी बाहेर जाऊन मोठा दगड आणून मगरीच्या डोक्यात घातला. त्यावेळी मगरीने कालवडीला सोडून दिले. कालवडीच्या पोटावर मगरीच्या दाताच्या मोठ्या खुणा होत्या. त्याचबरोबर पोटाखाली मोठी जखम झाली होती. दुपारी वारणा दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी सुमारे तीन तास कालवडीला झालेल्या जखमांना टाके घालून उपचार केले.

वारणा दुध संघाचे सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल मोरे, अमोल बच्ची यांनीही कालवडीवर उपचार केले. दरम्यान वारणा आणि कडवी नदीच्या काठावर मगरींचा मोठा वावर आहे. वनविभागाने या मगरींचा बंदोबस्त करावा, अशी या परिसरातील शेतक-यांची मागणी आहे. दोन वर्षापूर्वी सातवे ता.पन्हाळा येथील शेतकरी बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असताना, अचानक मगरीने शेतकर्‍यांवर हल्ला केला होता. त्यावेळी बैलाला बांधलेली दोरी शेतकर्‍याने आपल्या हाताला गुंडाळली होती , त्यामुळे मगरीने शेतकर्‍याचा पाय धरुनही बैलाने पाण्याबाहेर उडी मारल्यामुळे शेतकर्‍याचे प्राण वाचवले होते. या परिसरात सात ते आठ मगरींचा वावर असल्याचा अनेक शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष पाहिलेही आहे .

तरुणाच्या धाडसाचे कौतुक

बाजीराव शेवडे यांनी नदीच्या काठावर मगरीचा हल्ला यशस्वी होवू दिला नाही. कालवडीच्या जीवावर आलेले केवळ धाडसाने प्रसंग टळला गेला. बाजीरावच्या या धाडसाचे काैतुक होत आहे.

Leave a Comment